Meta tags:
description= The greatest WordPress.com site in all the land!;
Headings (most frequently used words):
the, vasantlimaye, इतिहासाच्या, पाऊलखुणा, किशोरपण, देगा, देवा, जीवेत, शरदः, शतम्, माझे, पुस्तकविक्रीचे, प्रयोग, मंडळ, आपलं, आभारी, आहे, शुभास्ते, पंथानः, सन्तु, मायाळू, मामा, पळशीकरांचा, वाडा, जुने, जाऊ, द्या, मरणालागुनी, नातिचरामि, post, navigation, greatest, wordpress, com, site, in, all, land,
Text of the page (most frequently used words):
आणि (252), आहे (149), होता (83), होती (70), होतं (61), असे (60), नाही (53), होतो (48), मला (46), आम्ही (44), झाली (38), म्हणजे (38), असं (37), दोन (36), अशी (36), अनेक (36), त्या (35), आहेत (34), माझ्या (34), म्हणून (34), काही (34), होते (30), झाला (28), माझी (26), खूप (26), अश्या (24), तरी (24), देखील (23), काय (23), त्यांच्या (23), झालं (22), वसंत (21), आला (21), करत (21), असा (20), #vasant (20), एका (19), आली (18), अशा (18), साहसी (18), गेलो (17), असतात (17), असतांना (17), केली (17), त्यामुळे (17), असलेल्या (17), आपण (16), लेखक (16), प्रकाशन (16), झाले (15), आजही (15), घेऊन (15), साली (15), सारं (15), करून (15), गेल्या (15), प्रकाशक (15), चार (14), दिवशी (14), तेव्हा (14), यात (14), मधे (14), मार्केटिंग (14), त्यांची (13), मंदिर (13), कधी (13), कादंबरी (13), गोष्टी (12), तीन (12), सुरू (12), दोन्ही (12), सुमारे (12), पुढे (12), आनंद (12), लागली (12), माझा (12), खरं (12), वाडा (12), तिला (12), comment (11), लिमये (11), अचानक (11), मित्र (11), वेळ (11), आमच्या (11), अनेकदा (11), विविध (11), केलं (11), विषय (11), मात्र (11), आता (11), च्या (11), मागे (11), पळशी (11), standard (10), बाहेर (10), म्हणजेच (10), याच (10), गोष्ट (10), करणे (10), गप्पा (10), झाल्या (10), असल्यानं (10), चालू (10), एकदा (10), दिवस (10), काळात (10), आलं (10), येथे (10), काम (10), गेली (10), पर्यटन (10), त्याच (10), केला (10), माझं (10), जाणवत (10), कार्यक्रम (10), limaye (10), मस्त (10), डॉक्टर (10), प्रयत्न (10), पुस्तक (10), त्यात (10), ओळख (9), तुम्ही (9), साहस (9), त्याचा (9), असेल (9), पाच (9), त्यानंतर (9), पाणी (9), शाळेत (9), विचार (9), येत (9), होत (9), यांच्या (9), मोठ्या (9), लेखन (9), किंवा (9), नंतर (9), माणूस (9), नेहमीच (9), हात (9), 2024 (9), समारंभ (9), तिच्या (9), माणसं (8), झालो (8), लागतात (8), होऊन (8), रात्री (8), प्रेम (8), सोबत (8), होत्या (8), आमची (8), मनात (8), आम्हाला (8), गाव (8), निघालो (8), त्यांना (8), पूर्ण (8), मध्ये (8), वर्षं (8), आपल्या (8), वर्षांपूर्वी (8), दहा (8), गेलं (8), समोर (8), साऱ्या (8), अफाट (8), मराठी (8), मिळालं (8), माझे (7), नाती (7), त्यांचा (7), संबंध (7), आले (7), वाटतं (7), एखाद्या (7), खाली (7), आलो (7), तास (7), दुसऱ्या (7), पुढील (7), पुन्हा (7), जवळ (7), साठी (7), हजार (7), थक्क (7), महिन्यात (7), करण्यासाठी (7), पोचलो (7), अजित (7), नवीन (7), येथील (7), मोहिमा (7), मिळाला (7), महाराष्ट्रात (7), प्रथमच (7), भाग्य (7), जाऊन (7), अतिशय (7), जाऊ (7), गेले (7), त्यांनी (7), अनिल (7), असलं (7), कसं (7), अधिक (7), वर्षात (7), बाबा (7), कारण (7), पूर्वी (7), दिसतात (7), चित्रपट (7), घरी (7), काळजी (7), मोठी (7), बाबांच्या (7), तिचा (7), करू (7), प्रमोशन (7), यांच्याशी (6), जुन्या (6), अवघड (6), तुम्हाला (6), डोक्यात (6), सात (6), दिसत (6), नव्हती (6), इतक्या (6), राफ्टिंग (6), प्रवास (6), केवळ (6), मान्यवर (6), पुरस्कार (6), सुमारास (6), यांनी (6), त्याची (6), असूनही (6), यामुळे (6), पडलो (6), हिमालयातील (6), ठिकाणी (6), शकतात (6), अरे (6), त्याच्या (6), अंगावर (6), तयार (6), नोव्हेंबर (6), गडावर (6), सारेच (6), नकळत (6), यांना (6), यातील (6), सहज (6), leave (6), भान (6), असत (6), त्रास (6), लागले (6), लक्षात (6), मोठा (6), येते (6), साहजिकच (6), प्रकाशित (6), आल्या (6), कौतुक (6), विशेष (6), संस्था (6), जबाबदारी (6), पळशीकर (6), करणाऱ्या (6), असतं (6), भूमिका (6), लहान (6), काळ (6), याची (6), सहभागी (6), डॉक्टरांचा (6), करण्यात (6), सुरक्षा (6), vasantlimaye (5), wordpress (5), com (5), सारा (5), आपलं (5), नातं (5), आठवण (5), गिर्यारोहण (5), येणाऱ्या (5), अडचणी (5), हिमालयाच्या (5), वाटा (5), चढाई (5), संध्याकाळी (5), तुमच्या (5), येतो (5), पत्नी (5), स्थानिक (5), कुंडलिका (5), असू (5), कुतूहल (5), लगेच (5), धमाल (5), मैत्री (5), येऊ (5), लागलं (5), जेमतेम (5), सर्व (5), कुठे (5), त्यांचं (5), फक्त (5), फोन (5), कुणी (5), होणार (5), हवा (5), म्हणतात (5), क्षेत्रातील (5), त्याचं (5), वाटली (5), सुरुवात (5), गोड (5), कधीच (5), पसरलेला (5), नसे (5), वेळेस (5), म्हणत (5), गेला (5), फोटो (5), किती (5), त्याला (5), घेत (5), आयोजित (5), प्रसंग (5), काटा (5), राहतो (5), सादरीकरण (5), उपस्थित (5), म्हणाले (5), केलेली (5), येतं (5), परंतु (5), आमचं (5), अर्थातच (5), पहिल्या (5), प्रेमळ (5), राजगड (5), राजमाची (5), तसं (5), पाहिलं (5), लागला (5), आधी (5), the (5), जवळील (5), वेळा (5), घेतला (5), लाभलं (5), करायचं (5), येऊन (5), असला (5), नगर (5), आमचे (5), लवकरच (5), वाटत (5), विद्यार्थी (5), आईच्या (5), वारसा (5), भाग (5), एकीकडे (5), सध्या (5), जास्त (5), मायाळू (5), सर्जा (5), दत्ताजी (5), कुठलाही (5), गरुडमाचीला (5), योग (5), दिग्दर्शक (5), भूमिकेत (5), तिनी (5), नाहीत (5), होऊ (5), तिची (5), वयात (5), त्यासाठी (5), खाडीच्या (5), june (5), वाचक (5), सहभाग (5), पुस्तकाच्या (5), लॉक (5), ग्रिफिन (5), समावेश (5), टक्के (5), नमस्कार (5), देगा (5), देवा (5), शासकीय (5), उपक्रम (5), mac (5), २०२३ (4), डोंगर (4), नद्या (4), हीच (4), जाता (4), अविस्मरणीय (4), रंगलेल्या (4), अथवा (4), आठवतात (4), शांतपणे (4), इतिहास (4), आवाज (4), ऐकू (4), असलेला (4), वीस (4), कल्पना (4), बोट (4), बोटीवर (4), असंख्य (4), भटकंती (4), अनुभव (4), घट्ट (4), आवर्जून (4), ऐकून (4), पाहून (4), सहा (4), खरंच (4), चौकशी (4), थोडी (4), शक्य (4), चांगलं (4), करता (4), आपली (4), आमचा (4), वर्षी (4), अर्थानं (4), वर्षांत (4), असताना (4), मिळाले (4), सहजपणे (4), परत (4), त्यानी (4), चहा (4), आठवणी (4), सांगू (4), ऑक्टोबर (4), रोजी (4), कोकणकडा (4), उभा (4), कार्यक्रमात (4), गिरीभ्रमण (4), कोरलेली (4), मुंबई (4), विसरून (4), नाहीतर (4), सुरवातीस (4), पश्चिम (4), असलेलं (4), दरीत (4), ह्या (4), अनंत (4), स्पर्श (4), निसर्ग (4), सगळ्यात (4), ठाऊक (4), सकाळी (4), लवकर (4), सुंदर (4), जुने (4), नवनवीन (4), सवय (4), याचं (4), पुणे (4), वाचन (4), यांचे (4), नेने (4), प्रतिथयश (4), नक्की (4), आयुष्यभर (4), फार (4), उभी (4), असावेत (4), स्पष्टपणे (4), घेतली (4), लागलो (4), दिसू (4), असावा (4), दुर्दैवाने (4), महत्त्वाचा (4), भुईकोट (4), पळशीकरांचा (4), राजकीय (4), गरज (4), मुख्य (4), यांचा (4), राही (4), असून (4), तसेच (4), किल्ला (4), राजदत्त (4), दत्ताजींनी (4), वळून (4), लोकप्रिय (4), पूर्णपणे (4), पुण्यातील (4), यासाठी (4), देव (4), नव्हतं (4), धोतर (4), होईल (4), होतीस (4), सरकार (4), सांगायचं (4), बाबांचे (4), मोठं (4), मिळत (4), छान (4), काहीतरी (4), चंकु (4), सचिन (4), विश्वस्त (4), सादर (4), नये (4), दीड (4), प्रती (4), दुसरीकडे (4), करायचा (4), नाटकात (4), तर्फे (4), डॉक्टरांच्या (4), दादा (4), बदल (4), घडलं (4), लागू (4), एक्क्याण्णव (4), शाळा (4), किशोरपण (4), एम् (4), एच् (4), नियमन (4), सूचना (4), आयोजक (4), सुरु (4), प्रशिक्षण (4), site (3), छंद (3), असतो (3), आपल्याला (3), देतात (3), तिथल्या (3), व्यक्त (3), पाहिजे (3), म्हणावसं (3), फिरतांना (3), करतांना (3), शारीरिक (3), कष्ट (3), वाटेत (3), वातावरणात (3), उघड्या (3), कोसळणाऱ्या (3), दगडी (3), सारख्या (3), खळाळत (3), वाहणाऱ्या (3), थंडगार (3), पसाऱ्यात (3), कशाला (3), शिखर (3), असता (3), तुमचा (3), भरून (3), आठवतो (3), घारे (3), डोळे (3), मृणाल (3), परिसरात (3), नाव (3), मुंबईकर (3), येणारे (3), फूट (3), उतरतांना (3), जमेल (3), निमित्तानं (3), त्यांचे (3), गावातून (3), पाहुणे (3), गावात (3), जणांसाठी (3), प्रकार (3), बायको (3), फारच (3), हातात (3), शोधत (3), किलोमीटर (3), करणारे (3), तरुण (3), माझ्यासाठी (3), बसून (3), चांगलाच (3), उंच (3), तसा (3), यशस्वी (3), राहिली (3), वेगवेगळ्या (3), सहकारी (3), खऱ्या (3), गिर्यारोहणातील (3), विस्मयकारक (3), वेगळ्याच (3), उंचीवर (3), अद्भुत (3), सूक्ष्म (3), आहोत (3), उन्मेखून (3), ट्रेकवर (3), जवळीक (3), गावातील (3), आलेला (3), प्रेमसिंग (3), येतांना (3), शेजारच्याच (3), वर्षांचा (3), लावून (3), गवसलं (3), अचाट (3), माथ्यावर (3), प्रस्तरारोहण (3), किंबहुना (3), आलेल्या (3), गिर्यारोहक (3), त्यावर (3), करणारं (3), मंदिराच्या (3), पंधरा (3), मनावर (3), एकत्र (3), सुरवातीच्या (3), काळ्या (3), झाल्यावर (3), रॉक (3), कुठेतरी (3), सिंहगड (3), सुरवात (3), शालेय (3), टिळक (3), ठिकाणं (3), उबदार (3), उशीर (3), बहुतेक (3), प्रेमानं (3), नावं (3), जीव (3), देखणा (3), पलिकडे (3), गोडी (3), हायकिंग (3), क्लब (3), निमित्ताने (3), पहिल्याच (3), किल्ल्यावर (3), मजेत (3), शिव्या (3), देत (3), कसा (3), कुणास (3), माझ्याच (3), आणखी (3), कारणानं (3), अहो (3), गप्पांमध्ये (3), निघाला (3), सांगत (3), असणार (3), बोलत (3), असतील (3), चक्क (3), कशी (3), november (3), उदंड (3), सर्वांना (3), द्या (3), मरणालागुनी (3), प्रिय (3), अस्वस्थ (3), वाईट (3), चांगल्या (3), साहित्य (3), उत्साहात (3), माणसाला (3), थोर (3), घरचं (3), यावर (3), टाकला (3), ओळखीचं (3), महाराष्ट्र (3), आश्चर्य (3), तिथे (3), नशीबवान (3), डेंजर (3), गाडी (3), घडत (3), लागल्या (3), एरवी (3), सुरवातीला (3), दिला (3), तिथून (3), जरा (3), शेवटी (3), आधार (3), सर्वात (3), भीषण (3), डोळ्यासमोर (3), संवर्धन (3), इतर (3), उदासीन (3), आर्थिक (3), क्षेत्र (3), तेच (3), करतात (3), बाजूला (3), पार (3), लागतो (3), ४०० (3), स्थापत्य (3), अजूनही (3), लाजवाब (3), इतकं (3), मूर्ती (3), वाड्याच्या (3), पाहण्यासारखे (3), कुठल्याही (3), जिल्ह्यातील (3), टाकळी (3), ढोकेश्वर (3), दुसरी (3), वाट (3), काहीसा (3), पहात (3), खांब (3), सुरेख (3), रखुमाई (3), सभामंडप (3), संपूर्ण (3), कमी (3), पाहतांना (3), लक्ष (3), दिवाण (3), रामजी (3), यादव (3), कांबळे (3), भक्कम (3), शिलालेख (3), अगदी (3), तुमचं (3), काहीसं (3), वऱ्हाडातली (3), स्वागत (3), क्षेत्रात (3), नाटक (3), मिश्कील (3), आवाजात (3), रंग (3), सौम्य (3), बालपण (3), आईला (3), झालेला (3), अनेकांना (3), होतंय (3), दिली (3), नकोस (3), काळजीवाहू (3), जबाबदार् (3), तिच्याकडे (3), बाबांची (3), जात (3), एखादी (3), मध्यमवर्गीय (3), अर्थात (3), बसलो (3), करणारा (3), ठाण्यात (3), तिनं (3), केले (3), तिचं (3), पुण्यात (3), लोक (3), नसते (3), एकाच (3), असते (3), म्हटलं (3), मास्तर (3), नोकरी (3), गणित (3), श्रेय (3), नव्हता (3), उठून (3), कलाकार (3), नाटकं (3), मजा (3), पाहत (3), व्यवस्था (3), तयारी (3), गर्दी (3), पटकन (3), हिमालयाची (3), लेखकांनी (3), लेखकाने (3), कलाकृती (3), शंका (3), घेता (3), आजकाल (3), माध्यमातील (3), प्रसिद्धी (3), पुढाकार (3), नसून (3), वगैरे (3), निमित्त (3), पोस्ट (3), येणार (3), करतो (3), होतात (3), संदर्भातील (3), गांगल (3), पहिला (3), पहिली (3), जाहीर (3), ठाम (3), मुंबईत (3), दृष्टीने (3), सहसा (3), नेता (3), डॉक्टरांनी (3), पालक (3), अत्यंत (3), कुठल्याश्या (3), दिले (3), अभिनय (3), शिस्त (3), जातो (3), वाकून (3), डॉक्टरांना (3), सावली (3), दीपा (3), वर्गात (3), वर्ग (3), अभिमान (3), सुरक्षिततेचं (3), महत्त्वाचे (3), गरजेचे (3), मसुदा (3), मसुद्यात (3), हरकती (3), उपक्रमांसाठी (3), आधीच्या (3), क्रीडा (3), नियमावली (3), विभागाने (3), required (2), this (2), log (2), sign (2), blog (2), दिवाळी (2), नातीच (2), अपघातानं (2), वाटांवर (2), भव्य (2), रूप (2), नाले (2), जंगलं (2), अर्थ (2), उत्साह (2), होणं (2), जोडणं (2), खरी (2), गंमत (2), सर्वंकष (2), नातिचरामि (2), डोंगरात (2), तरीही (2), आल्हाददायक (2), निसर्गाशी (2), वेड (2), शेजारी (2), गप्पांच्या (2), सतत (2), पावसात (2), पहाटे (2), सोनेरी (2), घनदाट (2), सुचीपर्ण (2), हाडं (2), कॅम्प (2), छोट्या (2), क्षण (2), कुशीत (2), खडतर (2), क्षमतेचा (2), पराक्रम (2), कातळ (2), दाखले (2), बसलं (2), चिरे (2), कानात (2), दैदिप्यमान (2), इतिहासाच्या (2), निरपेक्ष (2), बांधून (2), दाढी (2), असणारी (2), यशोदी (2), आठवते (2), बहिण (2), आठवलं (2), अभिनव (2), ठरवली (2), दाखल (2), सीगल्स (2), नदीच्या (2), दुतर्फा (2), वयस्कर (2), कोळी (2), मुलगा (2), खाडीवर (2), फिरायला (2), बहुधा (2), अण्णांकडे (2), खोल (2), समुद्रात (2), जाणाऱ्या (2), अनुभवांचा (2), खजिना (2), आजूबाजूच्या (2), जमिनीपेक्षा (2), काठावरील (2), बकाल (2), दीपकच्या (2), शांत (2), अण्णांनी (2), काळातील (2), शिडाच्या (2), उल्लेख (2), होड्यांची (2), शर्यत (2), दिलं (2), जागृत (2), ट्रिप (2), परिवाराशी (2), मासळीचं (2), लग्नाच्या (2), वस्ती (2), जेवण (2), जेवणानंतर (2), आग्रह (2), गरीब (2), चकित (2), आहात (2), काढून (2), गळ्यात (2), पाउण (2), मंडळी (2), तब्येत (2), कुणीतरी (2), कानावर (2), गंगेच्या (2), शिवपुरी (2), आसपास (2), कोहली (2), यांची (2), सापडली (2), नव्हते (2), नदीवर (2), भेटले (2), चेहरा (2), बजाज (2), नसल्यानं (2), अजितनं (2), लाटा (2), कुटुंबातील (2), हिमाचल (2), करिअर (2), गोष्टींचा (2), पाचही (2), २००६ (2), निमित्त्तानं (2), शोध (2), घेण्यासाठी (2), त्याप्रमाणे (2), योग्य (2), यानंतर (2), सारखे (2), समजतो (2), येथून (2), कोर्स (2), ट्रेक्स (2), हिमालय (2), दिमाखदार (2), शिखरं (2), लहरी (2), सारंच (2), जातात (2), निसर्गाच्या (2), असल्याचं (2), असलो (2), अंश (2), राहात (2), स्वयंपाकी (2), लोकांशी (2), राहिला (2), गढवाल (2), भयानक (2), स्थितप्रज्ञ (2), मध्यंतरी (2), गंगोत्रीला (2), पासून (2), पुराली (2), गावी (2), दिवसांनी (2), धावत (2), कडकडून (2), मिठी (2), मारली (2), भीती (2), वाटून (2), चेहऱ्यावरून (2), आमच्यासाठी (2), गंगोत्रीच्या (2), त्याच्याकडे (2), असलेली (2), जुनी (2), डायरी (2), आकार (2), गावापासून (2), चढाईच्या (2), डिसेंबर (2), मोहीम (2), चढाईतील (2), भारतात (2), आधारित (2), दृक् (2), श्राव्य (2), कार्यक्रमास (2), पॉल (2), सर्वांनाच (2), पध्दतीनं (2), कोकणकड्याचं (2), परदेशी (2), शब्दात (2), माळशेज (2), चालत (2), मुक्काम (2), पसारा (2), देखणं (2), पुष्करणी (2), जाणारा (2), झालेल्या (2), भारावून (2), जाणं (2), राहिलो (2), बारा (2), जणं (2), दुपारी (2), पोचले (2), बरोबरच (2), देवळात (2), निळसर (2), अनोळखी (2), गावकरी (2), असल्याप्रमाणे (2), गाभारा (2), पडत (2), किल्ले (2), त्यावरील (2), दोनदा (2), बाबासाहेब (2), गाठ (2), पडली (2), भूगोल (2), क्लायंबिंगची (2), आवड (2), घेतलं (2), साऱ्याच (2), वर्षांच्या (2), जायचं (2), तोरणा (2), management (2), गडाच्या (2), mtdc (2), रिझॉर्ट (2), mountain (2), उशिरा (2), लागलेली (2), स्मरते (2), ठेवून (2), उजवीकडे (2), मरळ (2), पसरलेल्या (2), देणारी (2), चव्हाण (2), लावला (2), जडलेलं (2), खेळांची (2), फारशी (2), सोनसाखळी (2), डबा (2), गेल्यावर (2), रुईया (2), सालच्या (2), असंही (2), शीतल (2), सर्वांच्या (2), मनातल्या (2), करणार (2), बांधली (2), पुढल्याच (2), नोटिस (2), नेहमीच्या (2), पट्कन (2), म्हणे (2), असली (2), ऐकता (2), यातून (2), कदाचित (2), मते (2), कोण (2), मैत्रीचं (2), व्यसन (2), मलाही (2), महत्वाचं (2), वर्षाच्या (2), उत्तम (2), करा (2), आत्मा (2), स्पीड (2), घटना (2), बातम्या (2), वेढा (2), घातला (2), नुकतीच (2), शरीर (2), थकत (2), चाललं (2), नव्यानं (2), घालत (2), बाकी (2), भेटीला (2), टार्गेट (2), असद (2), शाह (2), गेल्याच (2), गद्रे (2), हजर (2), अफलातून (2), भेट (2), दांडेकर (2), यात्रा (2), जन्मगावी (2), दुर्दैवानं (2), देवाज्ञा (2), कुंदा (2), दोघंही (2), कामाला (2), जाण्याचं (2), गेलेला (2), कट्टर (2), जगभर (2), संघाचे (2), नेते (2), आदरातिथ्य (2), सावरकरांच्या (2), मनमुराद (2), बसला (2), तारीख (2), आयुष्यात (2), पहिल्यांदाच (2), माझ्याकडे (2), संस्कृती (2), चिठ्ठी (2), भलीथोरली (2), मंडळ (2), कयास (2), भीत (2), विचारलं (2), नाकाचा (2), म्हणाला (2), सांगितलं (2), विचित्र (2), जमलं (2), सूत (2), कहाणी (2), सोय (2), जाऊया (2), उजव्या (2), टीत (2), स्नेह (2), वर्षांनी (2), समजूत (2), भाव (2), आठवणींचा (2), आवृत्त्या (2), पहायला (2), मोठे (2), भावना (2), खरखरीत (2), मायेचा (2), देशमुख (2), येतात (2), स्थळं (2), करीत (2), शासनाची (2), याबाबतीत (2), त्यांच्याकडे (2), जातं (2), घरं (2), घोषित (2), संस्कारांचं (2), मिळू (2), शकेल (2), नियोजन (2), त्याचबरोबर (2), उदासीनता (2), झपाट्यानं (2), भविष्यात (2), वाड्याचे (2), कळते (2), राहते (2), वाड्याची (2), देखभाल (2), असो (2), हेही (2), जवळच (2), सांगतात (2), प्रवेशद्वार (2), देखणे (2), पहारेकऱ्यांच्या (2), देवड्याही (2), चौक (2), मराठा (2), बहुदा (2), राहत (2), नक्षी (2), वरच्या (2), मजल्यावर (2), जाण्यासाठी (2), जिनेही (2), भिंती (2), हळहळ (2), लाकडी (2), तशी (2), नावाचं (2), शिरताच (2), तुमच्याशी (2), अस्पष्ट (2), डोळ्यांना (2), लख्ख (2), सौंदर्य (2), सुबक (2), प्रसिध्द (2), मंदिराला (2), दिसतो (2), चहूबाजूंनी (2), मंदिराची (2), दगडात (2), गोलाकार (2), विठ्ठलाची (2), वैभव (2), दिसायला (2), वेधून (2), बांधलेल्या (2), मंदिराचा (2), नसावा (2), असावं (2), होळकरांचे (2), आनंदराव (2), येण्यासाठी (2), दरवाजा (2), असल्यामुळे (2), माहिती (2), मिळते (2), दोन्हीही (2), नाशिक (2), पळशीचा (2), दुरून (2), घेतो (2), नारायणगाव (2), देवकीनंदन (2), गोपाला (2), गोट्या (2), सखा (2), ज्ञानेश्वर (2), पानेआणिपानगळ (2), जन्म (2), गोवा (2), लघुपट (2), कारकीर्द (2), कसे (2), साधे (2), सृष्टीतील (2), लक्षण (2), भाग्याचा (2), हेवा (2), नव्वदी (2), जुळून (2), अंधेरी (2), हसतमुखानं (2), वयातही (2), व्यवस्थित (2), चांगले (2), लहानपणापासून (2), वर्षांची (2), विरळाच (2), वरील (2), मदतीसाठी (2), अजिंक्य (2), पहिलीच (2), रमेश (2), त्यातून (2), शिस्तप्रिय (2), मृदू (2), मार्ग (2), सरकू (2), शब्द (2), अंतर (2), एकच (2), बसणं (2), अशक्य (2), डोक्यावर (2), मवाळ (2), बोलणारे (2), दिग्दर्शकाच्या (2), याने (2), may (2), आयुष्य (2), म्हातारपण (2), दुसरं (2), आईचं (2), स्वरा (2), तिच्यावर (2), ठाण्याला (2), साऱ्यात (2), श्रांत (2), अचूक (2), बसवून (2), अक्का (2), पावलांनी (2), खुशाल (2), शुभास्ते (2), पंथानः (2), सन्तु (2), तिच्यासाठी (2), भाषांतराची (2), कामं (2), कुठेही (2), बसने (2), सुरक्षित (2), फिरून (2), घुसत (2), मर्यादा (2), लॅच (2), गुजराथी (2), बहीण (2), खेळत (2), वाऱ्यानं (2), दिवे (2), नको (2), थोडे (2), निघाले (2), गच्चीत (2), थंडी (2), जमाना (2), एकटी (2), लहानपणी (2), व्रात्य (2), बरोबर (2), मीच (2), बाळा (2), धपाटे (2), जबरदस्त (2), मिळवण्यासाठी (2), मोठेपणी (2), दुसरा (2), बाबांना (2), २०१४ (2), संपून (2), जुजबी (2), सुचवलं (2), श्रध्दा (2), धरून (2), लक्षातच (2), काळजीनं (2), मुलं (2), कितीही (2), हाताशी (2), जमत (2), क्लासेस (2), शंभर (2), वर् (2), हाडी (2), मोजून (2), करणं (2), संसार (2), वागण्यात (2), हाताला (2), तीस (2), आईचा (2), पुरणपोळ्या (2), नारळाच्या (2), वड्या (2), खात्री (2), लग्नानंतर (2), केलेला (2), तडक (2), अकोल्याची (2), कुठल्या (2), ठाण्यातील (2), इंग्रजी (2), जलविद्युत (2), प्रकल्प (2), अपूर्व (2), हवेत (2), चंद्र (2), करंदीकर (2), सादरीकरणात (2), व्यासंग (2), अभ्यास (2), मुखाशी (2), कालवण (2), अभिनेते (2), चंद्रकांत (2), काळे (2), भेटलो (2), लाईफ (2), विशेषतः (2), बकालपणा (2), गायब (2), सभोवतालच्या (2), फुट (2), जेवायला (2), कुलकर्णी (2), संधी (2), कधीतरी (2), उचलून (2), कॅम्पफायर (2), लेख (2), कल्पक (2), सर्जनशील (2), प्रयत्नात (2), विक्रेते (2), करावे (2), देखण्या (2), वापर (2), गरजेचं (2), इंटरनेट (2), प्रतिक्रिया (2), चित्रं (2), यांचाही (2), सुबोध (2), खेडेकर (2), मंडळींच्या (2), घटकांचा (2), घेणं (2), बदलत (2), चालली (2), २०१२ (2), बापू (2), फेसबुकवर (2), फायदा (2), लेखांचं (2), बुक (2), आवृत्ती (2), एकंदरीत (2), प्रामाणिक (2), हेतू (2), लिहित (2), लोकांनी (2), धारणा (2), लाज (2), सांगणारा (2), रसिक (2), पुस्तकाचं (2), संपल्या (2), निकष (2), सहाय्य (2), एजंट (2), समजून (2), घेण्याचा (2), लेखकाच्या (2), दिनकर (2), कुमार (2), कार्यक्रमाच्या (2), जागी (2), खर्च (2), कथा (2), भीड (2), कालावधी (2), प्रवासात (2), माझ्यावर (2), ग्रंथाली (2), सगळंच (2), हस्ते (2), व्यवहार (2), शकतो (2), असण्याची (2), करार (2), हवी (2), जाते (2), वाचून (2), थोडं (2), आवश्यक (2), प्रथितयश (2), हौस (2), नावाची (2), रॉयल्टी (2), वर्षाचा (2), प्रमोशनमध्ये (2), बाबत (2), मेहनत (2), तोच (2), मुद्दा (2), होणारे (2), जोशी (2), पाहण्यात (2), प्रयोग (2), दिसून (2), स्वच्छ (2), माणसाच्या (2), साल (2), अपघात (2), कांचनजंगा (2), कुठलीही (2), पत्र (2), शॉट (2), सहअभिनेत्री (2), चेहऱ्यावर (2), रिटेक (2), शॉट्स (2), अभिनयातील (2), ऐकलेलं (2), यामुळेच (2), डॉक्टरांची (2), सहवास (2), समजला (2), वाढदिवस (2), माणसाचा (2), मुंबईला (2), नटसम्राट (2), वयोमानपरत्वे (2), क्षमता (2), मनाच्या (2), देव्हाऱ्यात (2), जीवेत (2), शरदः (2), शतम् (2), शैशव (2), एकांकिका (2), नुकताच (2), मोहिनी (2), मधील (2), पध्दतीचा (2), सदरा (2), कंप (2), राजाध्यक्ष (2), स्टेजच्या (2), हाताची (2), स्थित्यंतर (2), १९८८ (2), उभे (2), २०१८ (2), पर्यंत (2), गणिताचा (2), संस्कृत (2), रुपेरी (2), विद्यालय (2), मान (2), दिमाखात (2), शाळेतल्या (2), चितळे (2), धडे (2), निश्चितच (2), नामांकित (2), सार्थ (2), वाटे (2), शाळेच्या (2), भाषा (2), एस् (2), गंभीर (2), आभ्यासात (2), भयंकर (2), खेळ (2), मार (2), टोकदार (2), तसे (2), स्वाभाविक (2), कामात (2), सुसूत्रता (2), आठवतंय (2), उलगडत (2), आठवणीचे (2), क्षेत्रासाठी (2), असणे (2), साहसासाठी (2), सर्वांनी (2), धोरणाचा (2), देण्यात (2), धोरणात (2), नोंदणी (2), तरतुदी (2), जाचक (2), स्वागतार्ह (2), सुरक्षिततेच्या (2), सदस्य (2), क्षेत्राला (2), मार्गदर्शक (2), निर्णय (2), सदोष (2), जमीन (2), macची (2), macचे (2), प्रणाली (2), adventure (2), grमधे (2), व्यक्ती (2), grच्या (2), खात्यातर्फे (2), याचा (2), साप (2), ज्येष्ठांकडून (2), क्लब्ज (2), व्यावसायिक (2), माध्यमातून (2), भारतातील (2), गिरीविहार (2), डोक्याला (2), दुखापत (2), greatest (2), all (2), land (2), search (2), website, name, email, write, loading, comments, collapse, bar, report, content, manage, subscriptions, view, reader, privacy, have, account, now, join, other, subscribers, subscribed, subscribe, older, posts, post, navigation, अंक, आसमंत, चराचरातील, सर्वच, असतंच, नसतील, हरवल्यासारखे, संदर्भ, निसर्गाचं, दिव्य, दिसलं, सगेसोबती, कानाकोपऱ्यातील, असतातच, गवसावी, तरच, सापडतो, भटकंतीसाठी, पडतांना, नात्यांची, नवी, गवसण्याचा, संचारतो, express, and, relate, माणसाचे, मुलभूत, गुणधर्म, जोडता, नात्यात, जगण्यातली, नात्यांसंबंधी, वेळोवेळी, धोके, निसर्गरम्य, एकरूप, संह्याद्रीतील, उग्रभीषण, कडेकपारी, लावणारे, सूर्यास्त, माळरानावर, शेकोटी, मैफिली, देवालयात, नाणेघाट, ऊबदार, गुहेत, काढलेल्या, संह्याद्रीची, रूपं, भल्या, दूरस्थ, हिमशिखरांना, चढलेला, मुलामा, निर्झराच्या, सोबतीनं, वृक्षांच्या, गर्दीतून, चढणारी, नागमोडी, पायवाट, गोठवून, टाकणाऱ्या, थंडीत, हिमनदीच्या, विस्तीर्ण, लागलेला, तंबूत, रंगलेले, पत्त्याचे, डाव, स्मरतात, वांझोटं, तर्काला, छेद, देणारे, वेचले, वाटचाल, आजमावणाऱ्या, गिरीभ्रमणात, सुप्त, कड्यावरील, प्रयत्नातील, मिळालेलं, पराक्रमाचे, गडकिल्ल्यांवर, मावळत्या, तटबंदीचे, कुजबुजतात, झुळकेबरोबर, घोड्याच्या, टापांचे, तलवारीचा, खणखणाट, शिवछत्रपतींच्या, आठवणींनी, अभिमानानी, डोंगरदऱ्यात, राहणारी, इतकंच, राजगडाच्या, मेटावर, धनगरवाडा, राहणारा, बाबू, भिकुला, लांबलचक, जावई, हनुमती, बोलके, मानलेली, भेटणं, यावरून, कोकणात, भटकत, वर्षांपूर्वीची, दिवसांपासून, मच्छिमाराची, कोकणातील, नद्यांच्या, खाडीत, सैर, कोर्लई, साळाव, ओळखीतून, रेवदंड्याच्या, जेटीवरून, सकाळची, लपलपणाऱ्या, लाटांचा, मच्छिमार, घोंगावणारे, खारफुटीचं, जंगल, साथीदार, गृहस्थांचं, अण्णा, दीपकही, पहिलेच, अण्णांनाही, मच्छिमारीसाठी, बोटी, मासेमारीतील, मनुष्यवस्तीच्या, खुणा, नजरेआड, उत्साहामुळे, अरुंद, उपखाड्यात, भटकून, सकाळच्या, काठावर, वेगवेगळे, पक्षी, स्मगलिंगच्या, सुरस, चमत्कारिक, कहाण्या, ऐकवल्या, तब्बल, परतीच्या, वाटेवार, ओघात, दरवर्षी, गुढीपाडव्याच्या, होणाऱ्या, होड्यांच्या, शर्यतीचा, जेटीवर, आग्रहपूर्वक, पुढच्या, पाडव्याला, पाहायला, येण्याचं, निमंत्रण, पाडव्याच्या, बोटीची, जेव्हा, मित्रमंडळींना, शर्यतीच्या, खाडी, अधुनमधून, ताज्या, पार्सल, घरपोच, यापूर्वी, समाजातील, कोणाशीही, मुंबईकरांच्या, ओळखीमुळे, सणवार, माहित, बहिणीच्या, लग्नाला, आमंत्रण, आदल्या, हळदी, आग्राव, मुंबईकराचं, घरांची, हळदीच्या, पाहुण्यांची, संख्या, चाट, साधारणतः, वसई, रत्नागिरी, भागातील, किनारपट्टीवरील, कोळ्यांच्या, घरांमध्ये, जेवणं, मटन, पाहूनच, नाचण्याचा, दागदागिन्यांनी, सजलेल्या, कोळीणींमध्ये, मित्राची, दीपकची, दोघींकडे, बघून, नाचणार, आईंनी, स्वतःसह, शेजारच्या, तिघी, चौघींकडून, सोन्याच्या, माळा, दोघींच्या, घातल्या, समाधान, प्रत्येकीच्या, किलो, सोनं, आजच्यासाठी, जगतात, पाण्याची, दीपकचा, हटकून, परिवारामुळे, समजलं, भेटतात, उत्तरकाशीला, मोकळा, गंगेवर, केल्याचं, पत्ता, किनाऱ्यानं, देवप्रयागकडे, रस्त्यावर, करुन, करताच, अविनाश, साईट, रिव्हर, गाईड, कुरळे, केस, गोरापान, हसरा, त्यातलाच, त्याच्याशी, गट्टी, जमली, क्लायंट्स, उत्साहानं, ठरवलं, लाटांवर, स्वार, फुगवलेल्या, राफ्टवर, किलोमीटरचा, थरारक, उसळणाऱ्या, रॅपिड्स, जीवघेणे, भोवरे, हिमालयातून, साहसाची, अजितमुळे, दिल्लीच्या, सधन, प्रदेशातील, कसौली, सनावर, अतिश्रीमंत, शिकलेला, वर्षांचं, शिक्षण, शिरलेला, खंडातील, एव्हरेस्टसह, शिखरांवरील, ध्रुवांवर, पोचलेल्या, मित्राला, पद्मश्री, उद्योजक, प्रस्थापित, वाखाणण्याजोगं, उद्योगामुळे, अबाधित, सालाच्या, करण्याच्या, भटकलो, काखेत, कळसा, गावाला, वळसा, ताम्हिणी, घाटात, उगम, पावणारी, नदी, राफ्टिंगसाठी, साजे, दूरटोली, फुगवायच्या, कयाक, मधून, राफ्टिंगची, शर्ली, दिया, मेघन, मुली, घनिष्ट, मैत्रीत, बाधा
Text of the page (random words):
मनमुराद भटकंतीत एक निखळ आनंद होता चल रे म्हणून मी कितीतरी जणांना या न मळलेल्या वाटांवर घेऊन गेलो रॉक क्लायंबिंग गिर्यारोहण यातील प्रशिक्षण घेतल्यावर विविध मोहिमा सुरु झाल्या शाळेतील लहान मुलांना साहस शिबिरांची गोडी लावण्यात एक धन्यता होती यातूनच पुढे स्कॉटलंडमध्ये प्रशिक्षण घेण्याचा योग आला अनेकांना गिरिभ्रमणातील धडे देण्यात विशेष आनंद मिळत असे या साऱ्या झपाटलेल्या प्रवासात साहसी क्रीडाप्रकारातील धोकेही स्पष्टपणे जाणवू लागले आणि सुरक्षिततेचं भान टोकदार होऊ लागलं adventure tourism या क्षेत्राची ओळख झाली परदेशी गिरीप्रेमींना हिमालयात नेणे अश्या व्यवसायात संधी मिळाली त्यातच साहस आणि निसर्ग यांच्या माध्यमातून management training करता येतं या अभिनव पध्दतीचा श्रीगणेशा भारतात करण्याचं भाग्य लाभलं या साऱ्या गोष्टी करतांना सुरक्षिततेचं भान कधी सुटलं नाही लौकिक अर्थानं वांझोट्या भटकंतीकडे व्यावसायिक सन्मान्य पेशा म्हणून पाहण्यात येऊ लागणं हे स्थित्यंतर माझ्या डोळ्यासमोर घडलं किंबहुना यात सहभाग घेता आला हे मी माझं भाग्य समजतो पण याचबरोबर गेल्या वीस वर्षांत सभोवतालच्या परिस्थितीत झपाट्यानं बदल घडत होता २९ मे १९५३ साली शेर्पा तेन्सिंग आणि एडमंड हिलरी यांनी जगातील सर्वोच्च शिखर एव्हरेस्ट प्रथमच सर केले ही एका अर्थाने भारतातील गिर्यारोहणाची आणि गिरीभ्रमणाची नांदी होती १९५४ साली मुंबईत युनिव्हर्सिटी हायकिंग क्लब सुरु झाला ज्याचे पुढे गिरीविहार मध्ये रुपांतर झाले तो काळ होता सिद्धहस्त लेखक आप्प्पा दांडेकर शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे पुण्यातील बापू काका पटवर्धन आनंद पाळंदे प्र के घाणेकर उषा भिडे तर मुंबईत हरीश कापडिया शरद पोवळेकर माळी सर आणि चांदेकर सर अश्या दिग्गजांचा जवाहरलाल नेहरूंनी इंग्लंडच्या राणीकडून मिळणारा सर हा किताब तेन्सिंगला नाकारायला लावून त्याच्या जन्मगावी म्हणजेच दार्जीलिंग येथे भारतातील hmi ही पहिली गिर्यारोहण प्रशिक्षण संस्था सुरु केली हौशी भटके गिर्यारोहणाचे प्रशिक्षण घेऊन क्लबच्या माध्यमातून हिमालयातील शिखर मोहिमांवर जाऊ लागले यासोबतच अनेकजण गडकोटांच्या अवघड बिकट वाटा जवळ करू लागले प्रस्तरारोहण म्हणजेच रॉक क्लायंबिंगची सुरुवात होऊन ८०च्या दशकात जीवधन जवळील वानरलिंगी खडा पार्सी ड्युक्स नोज आणि कोकणकड्यासारख्या मातब्बर चढाया झाल्या गिरीविहार तर्फे कांचनजंगा शिखरावर १९८८ पहिली नागरी मोहीम आयोजण्यात आली तर १९९८ साली पहिला मराठी माणूस सुरेंद्र चव्हाण एव्हरेस्टवीर झाला गेल्या १० वर्षात गिरीप्रेमी या संस्थेनं हिमालयातील सात अष्टहजारी शिखरं पादाक्रांत केली साऱ्या साहसी क्षेत्रासाठी छत्रपती शिवराय हे दैवत तर राकट रांगडा संह्याद्री हे स्फूर्तीस्थान आहे महाराष्ट्रात गिरीभ्रमण या छंदाला सत्तर वर्षांची परंपरा आहे विविध संस्था आणि क्लब्ज आपापल्या परीने सुरक्षेची काळजी घेत असत सुरक्षा विषयक काळजी घेण्याची शिस्त ज्येष्ठांकडून नवोदितांना गुरु शिष्य परंपरेप्रमाणे अनौपचारिक रित्या मिळत असे साहित्य फिल्म्स आणि इंटरनेट यामुळे गेल्या २० वर्षात सारेच साहसी उपक्रम अफाट लोकप्रिय झाले क्लब्ज व्यतिरिक्त व्यावसायिक संस्था आणि व्यक्ती या क्षेत्रात हिरीरीने उतरल्या दुर्दैवाने अपघातांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली निसर्गाच्या ऱ्हासाचे प्रमाण भयानकरित्या वाढले साहसी उपक्रमांचे सुरक्षिततेच्या दृष्टीने नियमन करणे आत्यंतिक गरजेचे भासू लागले इंटरनेटमुळे माहितीचा विस्फोट वाढलेली क्रयशक्ती सेल्फी संस्कृती आणि चंगळवादी बाजारीकरण हे साहसी क्रीडाक्षेत्रात अलगदपणे कधी शिरलं ते लक्षातच नाही आलं एकीकडे गिरीभ्रमण निसर्गप्रेम लोकप्रिय होतंय याचा आनंद होता तर दुसरीकडे याच क्षेत्रात शिरणाऱ्या अनिष्ट प्रथा चिंताजनक होत्या या साऱ्याला आपणही कारणीभूत तर नाही असा अतिरेकी विचार कधीकधी मनाला कुरतडतो पण नाही या क्षेत्रातील पूर्वसूरींकडून जाणत्या ज्येष्ठांकडून जे मिळालं ते देण्याचाच शक्य तितका प्रयत्न केला आहे आणि यामुळेच आज हे सारं पाहतांना अस्वस्थ होतो mac चा प्रयत्न अनेकजणांच्या याच तळमळीतून उभा राहतो आहे मग दोन gr आले त्यांच्या अव्यवहार्यतेला विरोध होता या सर्व गोष्टींचे नियमन व्हायला हवे आणि त्यासाठी प्रयत्न करणे शासनाला सहाय्य करणे हीच भूमिका होती नियमन ही जबाबदारी शासनाची आहे हे काम शासनाच्या कुठल्या विभागाने करावे हा निर्णय सर्वस्वी शासनाचाच असणे स्वाभाविक आहे सध्याचा मसुदा पर्यटन विभागाने जारी केला म्हणून साऱ्या साहसी मोहिमा म्हणजे पर्यटन असा अर्थ लावणे चुकीचे आहे साहसासाठी साहस करणाऱ्या व्यक्ती अथवा संस्था शिखरचढाई प्रस्तरारोहण मोहिमा सध्याच्या grच्या व्याप्तीत कक्षेत येत नाहीत मोठा गैरसमज क्रीडा खात्यातर्फे गिर्यारोहणास मिळणाऱ्या पुरस्कारांसंदर्भात आहे २०१४ सालचा पर्यटन खात्याचा gr असतांनाही हे पुरस्कार क्रीडा खात्यातर्फे दिले जात होते आणि पुढेही दिले जाऊ शकतात त्यमुळे याचा संबंध नियमनाशी जोडणं गैर आहे २०१८चा gr लागू करण्यापूर्वी काही मोजक्या तज्ञांचा शासकीय समितीत समावेश होता तरीही आधीच्या दोन्ही grमधे फारसा फरक नाही आणि दोन्हीही तितकेच सदोष आहेत यात काही संस्था कुठलेही निकष न लावता मान्यताप्राप्त म्हणून घोषित करण्यात आल्या आणि क्षमता न तपासता त्यांच्यावर महत्त्वाच्या जबाबदाऱ्या टाकण्यात आल्या हा हेतुपुरस्सर पक्षपात असावा अशी शंका घेण्यात येत आहे दुर्दैवाने भावनिक आवाहन करत काही मंडळी साप साप म्हणून भुई धोपटत आहेत आधीच्या दोन्ही grच्या तुलनेत या मसुद्यात खूप तथ्य आहे गरज आहे सुधारणांची महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा gr साहसी उपक्रम आयोजित करणाऱ्यांसाठीच लागू आहे आधीचे दोन्ही शासकीय निर्णय सदोष व अव्यवहार्य असल्याने काही अनुभवी जाणकारांनी रिट पिटीशन दाखल केले २०१८ नंतर जमीन पाणी आणि हवा या माध्यमातील साहसी उपक्रम आयोजित करणाऱ्या सर्वांनी एकत्र येण्यासाठी महा अॅडव्हेंचर काउन्सिल mac या संस्थेची स्थापना झाली चांगले नियोजन आणि आणि सुरक्षितता हे macच्या जिव्हाळ्याचे विषय आहेत macची भूमिका साहसी क्षेत्रावर नियंत्रण मिळवण्याची नसून सल्लागाराची आहे त्यात पारदर्शकता आहे दोन gr मधील जाचक तरतुदींविरुद्ध ठाम भूमिका घेतल्यामुळे साहस क्षेत्राला होणारा त्रास वाचला आहे आणि यावेळीही macचे तसे प्रयत्न सुरु आहेत २०१३ सालापासून macचे सदस्य साहसी उपक्रमांसाठी सुयोग्य मार्गदर्शक प्रणाली तयार करण्यासाठी कार्यमग्न आहेत atoaiच्या adventure tour operators association of india सुरक्षा नियमावलीचा समावेश आधीच्या दोन्ही grमधे होता १ ऑक्टोबर २०१९ मध्ये mac तर्फे ६५७ पानांचे सादरीकरण क्रीडा व पर्यटन विभागास सादर करण्यात आले या सादरीकरणात mac तर्फे सुरक्षा नियमावली व प्रणाली सविस्तरपणे मांडण्यात आली होती पर्यटन विभागाने atoaiची आणि macची सुरक्षा नियमावली शिवाय bis व iso मानकांशी मेळ घालून जमीन हवा पाणी अश्या माध्यमातील साहसी उपक्रमांसाठी विस्तृत नियमावली तयार केली मसुद्यातील विमा संदर्भातील तरतुदी सुरक्षिततेच्या दृष्टीने स्वागतार्ह आहेत मसुद्यात सुसूत्रता स्पष्टता आहे तसेच विविध उपक्रमांची अचूक माहिती असून त्यामुळे सर्वांच्या जबाबदार् या स्पष्टपणे अधोरेखित होतात साहसी उपक्रमात नेता आयोजक आणि सहभागी सदस्य यात नेता आयोजक अधिक जबाबदार असतात साहसी उपक्रम आयोजक आयोजक संस्थातील संचालक भाग घेणारे सभासद आणि पालक यांच्यासाठी या सूचना योग्य मार्गदर्शन करू शकतील कुठलाही आगापिछा नसलेल्या बेजबाबदार आयोजकांमुळे असुरक्षितता वाढते आणि साऱ्या क्षेत्राला काळिमा लागतो अश्या सर्वांना या धोरणात समाविष्ट करणे हा या धोरणाचा आत्मा आहे तात्पुरत्या नोंदणी प्रमाणपत्राच्या अर्जासोबत सुरक्षा मार्गदर्शक नियमावलीचे पालन करण्याचे हमीपत्र देणे हा अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे २४ सप्टेंबर २०२० रोजी साहसी उपक्रमांसाठी शासकीय धोरणाचा मसुदा सूचना हरकती यासाठी जाहीर करण्यात आला यासाठी २२ ऑक्टोबर पर्यंतची मुदतही देण्यात आली साहस हा क्रीडाप्रकार की पर्यटन असा वाद निसर्ग सहली व वाईल्ड लाईफ सफारी यांचा या धोरणात समावेश असावा की नसावा असे विविध संभ्रम उपस्थित झाले शासकीय धोरणातील सुरक्षा नियमावलीतील क्लिष्टता व बोजडपणा तसेच नोंदणी शुल्क व दंडनीय कारवाई संदर्भातील तरतुदी सर्वांनाच जाचक भासल्या या संदर्भात ४०० हून अधिक सूचना व हरकती शासनाकडे आल्या असल्याचे कळते या क्षेत्रातील सुरक्षिततेसाठी पर्यटन मंत्रालयामार्फत शासनाने घेतलेला पुढाकार स्वागतार्ह आहे पूर्वी हे क्षेत्र मर्यादित होतं आणि सुरक्षिततेचं भान होतं बाहेरून कुणाकडून करण्यात येणार् या नियमनाची आपल्याला सवय नाही करोना काळात विचार करण्यास वेळ मिळाला आणि सध्या चालू असलेले विचारमंथन खूप महत्त्वाचे आहे या क्षेत्रासाठी शासकीय नियमन प्रथमच घडत आहे त्यामुळे ते अधिक सौम्य असणे गरजेचे आहे न्यूझीलंड सारख्या देशाने या प्रक्रियेसाठी पाच वर्षाचा कालावधी दिला होता हा मसुदा तयार करणाऱ्या सर्वांचे अभिनंदन सर्वांचा सहभाग म्हणजे २००६ साली प्राण गमावलेले दोघे आणि त्यांचे पालक यांना न्याय देण्यासारखे आहे साहसी छंदातून या क्षेत्रातील अनेकांना तसेच स्थानिकांना उत्पन्नाचे साधन मिळाले आणि महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेसाठी हे महत्त्वाचे आहे साहसासाठी साहस करणारे आणि साहसी उपक्रम करणारे एकमेकांसाठी पूरक आहेत या मसुद्यात अनेक सुधारणा आवश्यक आहेत त्यासाठी सूचना हरकती विनाविलंब शासनास कळविणे गरजेचे आहे आपलेच क्षेत्र अधिक सुरक्षित आणि सक्षम करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे खूप महत्त्वाचे आहे वसंत वसंत लिमये standard किशोरपण देगा देवा june 6 2024 vasant vasant limaye 1 comment बागडणारं खळाळणारं खेळकर शैशव या अजाण बाळपणाकडे पाहतांना मोठेपणी चटकन् एक उसासा टाकला जातो आणि म्हणावसं वाटतं बालपण देगा देवा पण मला आत्ताही स्वच्छ आठवतंय की जाणीवपूर्वक तेव्हाही संपू नये अशा वयात मला वाटलं होतं किशोरपण देगा देवा आणि ते होते आंबट गोड आठवणीचे शालेय दिवस खेळांची अभ्यासाची नवनवीन पुस्तकांची झिंग असणारे दिवस युक्लीडच्या भूमितीत रसायनांच्या चमत्कारात हरवण्याचे सावरकरांच्या कवितेनं राष्ट्रतेजाने भारावण्याचे ते मयूरपंखी दिवस आणि या रुपेरी कालखंडाला एक छान आवरण लाभलं होतं ते म्हणजे मो ह विद्यालय माझी शाळा आजही एम् एच् म्हटलं की आठवणीचे एकेक रंग उलगडत ते इंद्रधनुषी दिवस डोळ्यासमोरून सरकू लागतात पुन्हा एकदा म्हणावसं वाटतं किशोरपण देगा देवा प्राथमिक शाळेतून मोठ्या शाळेत जायचं म्हणजे केवढा मोठा सोहळा माझ्या चिमुकल्या डोळ्यांना ती पिवळसर भलीथोरली इमारत केवढी भव्य वाटली होती थोडीशी भितीही वाटली होती ते मोठ्ठाले असंख्य वर्ग मोठी मुलं भयंकर मोठ्या कामात असल्याच्या दिमाखात कॉरीडॉरमधून फिरतांना दिसत होती सगळ्याच वातावरणात एक शिस्त भारदस्तपणा होता पहिल्यांदाच मला माझं बाक मिळालं कोण आनंद झाला होता त्या पहिल्याच दिवशी मी निश्चितच भारावून गेलो होतो आज शाळेच्या आठवणी आठवतांना एक सरमिसळ होऊन जाते अनेक चेहरे प्रसंग डोक्यात गर्दी करू लागतात या सर्वांना सुसूत्रता आणण्याऐवजी जसं आठवतंय तसं उलगडत जातो शाळेत पोचायला उशीर झाला की दरवाज्यावर धोतर सदऱ्यात गरुडाच्या चोचीप्रमाणे टोकदार नाकाचा खरखरीत आवाजाचा डेंजर माणूस या लिमये म्हणून छडीच्या प्रसादासकट स्वागत करायचा मग वेगवेगळ्या नामांकित थापा मारून उकिडवे मास्तरांच्या हातून निसटण्याची धडपड चाले आम्हाला तसे खूप मारकुटे मास्तर होते अशातला भाग नाही पण मी टारगटपणा करण्यात पुढे असायचो आता त्याला ते तरी बिचारे काय करणार मग कानाशी हाताची हाताशी छडीची सलगी होणं स्वाभाविक होतं पण या बरोबर हेही खरं होतं की आमचा मेंदू बऱ्यापैकी काम देई अर्थात त्याचं कौतुक व्हायचं प्रोत्साहन मिळायचं एकंदरीत मी मार तसा खरपूस खाल्ला पण त्यामुळे एक मजा होती नाहीतर सगळंच कसं मिळमिळीत झालं असतं मी बापट्या आणि एस् टी जोशी असं उचापती करणारं त्रिकूट ८ ९वीत असतांना तयार झालं घट्ट झालं वर्गात आवाज काढण्यापासून डबे पळविणे मुलींची टिंगल करणे अशी धमाल चालायची वर्गाबाहेर नुसते अथवा आंगठे पायाचे धरून उभे असण्याची या त्रिकूटाला सवय होती ६ ७वीत सोनसाखळी हा अत्यंत लोकप्रिय खेळ ४था पिरियड कधी एकदा संपतो आणि चिंगाट धावत मागच्या ग्राउंडवरच्या आंब्याच्या झाडाला जाऊन शिवतो असं झालेलं असे अशा धावण्यात अनंत वेळा तडमडलो आहे गुडघे ढोपरं फोडून घेतली आहेत पावसाळ्यात चिखलात बरबटून युनिफॉर्म खराब करणे मग घरी शिव्या वा मार खाणे हे नित्याचं होतं ८वी पर्यंत खरं सांगायचं तर मी चक्क उनाड होतो शाळा म्हणजे धम्माल आणि तीही खेळण्यासाठी अशी माझी गोड समजूत होती ८ वीत वर्गात नंबर ३१वा गेला आणि आमच्या तीर्थरूपांनी आमची घरी पूजा बांधली शाळेत त्या वयात नीट आभ्यास केला नाही तर पुढे आयुष्यात काही तुझं खरं नाही असं वडलांनी रागावून गोंजारून सांगितलं त्याचा निश्चित परिणाम झाला कुठेतरी आपण आभ्यासात मागे आहोत याची खंत वाटली लाज वाटली पण त्यानंतर मागे कधी वळून पाहिलं नाही खोड्या खेळ या बरोबरच मी मन लावून आभ्यासाला लागलो ठाण्यातली नामांकित जुनी शाळा आणि तिचे आपण विद्यार्थी हा सार्थ अभिमान त्या काळात मिळाला अमूक एका गोष्टीवर बोट ठेवून नाही सांगता येणार की यामुळे अभिमान वाटे पण एक मात्र खरं शाळेबाहेर देखील तू एम् एच् चा कां असं म्हणून एक मान मिळत असे आणि याचं श्रेय शाळेच्या इतिहासाला आणि शिक्षकांना होतं त्या संस्कारक्षम वयात या शिक्षकांचा विशेष प्रभाव आमच्यावर होता सायन्स शिकवतांना सुबोध देशपांड्यांच्या पोरसवदा चेहऱ्यावरून एक आनंद ओसंडत असे तर संस्कृत सारखी क्लिष्ट भाषा सुलभ करून दाखवणारे देहभान हरपून शिकवणारे आचार्य सर त्यांचं रूप मोठं गंमतीशीर होतं धोतर सदरा डोक्यावर टोपी शिडशिडीत उंच अंगलट कुठेतरी पुलंच्या चितळे मास्तरांशी नातं सांगणारा हा मास्तर इंग्रजी भाषेचं सौंदर्य खुलवणारे एस् व्ही एक ऋषीतुल्य व्यक्तिमत्व स्थितप्रज्ञ म्हटल्यावर माझ्या समोर त्यांचाच चेहरा उभा राहतो वरून गंभीर वाटणारा हा माणूस विद्यार्थ्यांना पोटच्या पोरा पलिकडे प्रेम करणारा या साऱ्यांनीच तो काळ समृद्ध केला आभ्यासात ९वीनंतर रस येऊ लागला होता गणित आणि विज्ञान हे भयंकर प्रिय विषय गणित आणि त्यामागचं तर्कशास्त्र यानी तेव्हा एक मोहिनी घातली होती रायडर्स बीजगणितं सोडवणं हा आवडता छंद भाषा विषय विशेषतः मराठी याची आवड त्याच काळात लागली मराठी भाषेच्या समृद्धतेची ओळख झाली आणि आपण मराठी मिडीयमचे म्हणून न्यूनगंड असण्याऐवजी एक सार्थ अभिमान वाटे एम् एच् नी भविष्यासाठी एक मस्त शिदोरी बांधून दिली वाचनाची गोडी खूप शिकावं अशी जिद्द वक्तृत्व नाटक असं काय काय तरी मुख्य म्हणजे एक आत्मविश्वास मिळाला चांगलं काय वाईट काय या संस्कारांचे धडे कधी गिरवले नाहीत पण निश्चितच हे सारं त्या शालेय वातावरणातून मिळालं ११वीत प्रिलीमला मी वर्गात पहिला आलो साहजिकच विद्यार्थी दिनाला मुख्याध्यापक व्हायचा मान माझा होता आयुष्यातल्या पहिल्या फुलपँटमधे मोठ्या दिमाखात त्यादिवशी शाळेत पोचलो मोठी धमाल होती केबिनमध्ये रुबाबात बसणं हातात छडी घेऊन शाळेत मारलेली राउंड १०वी अ चा वर्ग अतिशाहणा समजला जायचा त्या वर्गाचा मी अर्थात गणिताचा तास घेतला होतां एक कठीण रायडर सोडवायला देऊन मंडळींची दाणादाण उडवली होती मग शाळेतल्या खऱ्या चितळे मास्तरांसारखं मिश्कील हसत मी विचारलं अरे सगळ्यात हुशार मुलांचा वर्ग एवढी सोपी गोष्ट जमत नाही वर्गावर पाठवायला नोटिस नव्हती साहजिकच शिपाई झालेल्याला काम नव्हतं मग काही नाही दुसऱ्या दिवशी मी सुटी जाहिर केली नंतर शिव्या खाल्ल्या एकंदरच फार मजा आली खरं सांगू शाळेतल्या आठवणी हा एवढा जिव्हाळ्याचा विषय की काय सांगू आणि काय नको असं होतं एक मात्र खरं की शाळेनं खूप काही दिलं आणि आज मी जो काही आहे त्यात एम् एच् चा महत्त्वाचा वाटा आहे आम्ही खरंच भाग्यवान शाळेसंदर्भात बोलतांना बऱ्याच जणांकडून ऐकतो शाळा म्हणजे तुरुंग गणिताचा राक्षस संस्कृत नावाची चेटकीण मारकुट्या मास्तरांचे दैत्य अशा नरकप्राय आठवणींचा काळ कोमेजून गेलेलं किशोरवय पण नाही मला आजही ते दिवस गमतीचे आनंदाचे रुपेरी दिवस म्हणून आठवतात कारण एकच मो ह विद्यालय आणि म्हणूनच पुनश्च म्हणतो किशोरपण देगा देवा वसंत वसंत लिमये standard जीवेत शरदः शतम् june 6 2024 vasant vasant limaye leave a comment अरे आज हे सगळे दिवे का लावले आहेत डॉ लागू दादा तुमचा वाढदिवस आहे आज तुम्ही एक्क्याण्णव वर्षांचे झालात इति मी दादा हे त्याचं घरचं संबोधन छे एक्क्याण्णव कशी असतील मग आमचा हिशेब सुरू झाला १९२७ अधिक दहा म्हणजे सदोतीस अशी आमची गाडी दोन हजार सतरा म्हणजे नव्वद आणि आता आहे २०१८ म्हणजे एक्क्याण्णव पर्यंत पोचली आवाजात कम्प असला तरी उच्चार स्पष्ट खरंच एक्क्याण्णव झाली की एखाद्या लहान मुलासारखा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर होता संध्याकाळी पाचचा सुमार सकाळपासून अनेक लोक येऊन गेले असणार रात्री जेवायला घरचेच पाहुणे येणार म्हणून दीपा तयारी करण्यात गुंतली होती दीपा म्हणजे अचाट आदरातिथ्य शेवटी मीच म्हटलं अगं तू आवरून घे मी आहे दादांपाशी तेव्हा कुठे ती जरा मोकळी झाली दादांना एका जागी बसून कंटाळा आला असावा म्हणून ते उठून दुसऱ्या कोचाकडे निघाले पायातल्या सपाता गुळगुळीत टाईल्सच्या फरशीवर घसरत होत्या मी पटकन उठून दादांचा हात हाती घेऊन पाठीला आधार दिला दहा एक वर्षांपूर्वी असं करण्याची माझी टाप नव्हती कारण दादा लगेच म्हणाले असते अरे मला काय झालंय अशा वेळेस अश्या मंडळींच्या अंगात कुठून कशी ताकद येते कुणास ठाऊक पण आज दादांच्यातला तो ताठर पीळ विरघळून गेल्यासारखा भासला पाठीवरच्या हाताला उबदार स्पर्श जाणवत होता एखाद्या लहान मुलासारखे ते भासत होते खरंच म्हातारपण हे दुसरं शैशव असतं एका अर्थानं मी खूप नशीबवान आहे १९७८चा काळ असेल आयआयटीत असताना दीपा एकांकिका स्पर्धेची परीक्षक म्हणून आली होती तेव्हा दीपाशी ओळख झाली आणि लवकरच डॉक्टरांशी केवळ अपघाताने त्याच सुमारास मी नुकताच नाटकात लुडबुड करू लागलो होतो उन्मेष च्या एकांकिका स्पर्धेत मी पारितोषिक पटकावलं हो...
|